Tuesday, August 14, 2018

आ चंद्र सूर्य नांदो.....



वैचारिक वादविवाद,राजकीय मते,विचारधारांतील अंतर आणि एखाद्या गोष्टीचे  'समर्थन' वा 'विरोध' या सर्वांच्या पलीकडे जाणारा आजचा दिवस. लाल किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर किंवा अगदी आपापल्या ठिकाणी डौलाने फडकणारा 'तिरंगा' पहिला की एका उन्नत अभिमानाने मन भरून येते. मुळातच एका सहिष्णू संस्कृतीचे वारसदार असणारे आम्ही भारतीय, सत्तर वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या लोकशाही शासन व्यवस्थेशी,आमच्या गुण-दोषांसकट तादात्म्य पावलो आणि म्हणता म्हणता चौफेर प्रगतीचे कितीतरी मोठे अंतर पार करून आलो ! 

राष्ट्रीय काँग्रेस मधील जहाल विचारसरणीने समाजसुधारणांचा मार्ग काही काळ रोखून धरला हे खरे पण शेकडो वर्षे दडपल्या गेलेल्या 'मूकनायकां'चा आवाज इतका प्रबळ होत गेला कि अखेरीस राजकीय आणि सामाजिक आंदोलन हातात हात घेऊनच उभे राहिले.  गांधीजींनी सामान्य माणसाला लढ्यासाठी उभे केले तर बाबासाहेबांनी देशाच्या मानवी संवेदनांना अक्षरशः प्रहार करून जागे केले. गांधींजींच्या प्रसंगी आदर्शवादाकडे जाणाऱ्या धोरणांना व्यवहाराची जोड दिली ती नेहरू-पटेलांनी. एकमेकांना चुकांची जाणीव करून देणारा पण तरीही देशाच्या ऐन कसोटीच्या क्षणी दोघांनाही एकदिलाने कार्यरत ठेवणारा त्यांच्यातील पत्रव्यवहार हा प्रगल्भतेची साक्ष आहे. पंडित नेहरू, होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या मैत्रीतून फुलले ते निखळ विज्ञाननिष्ठेचे स्वप्न. अहमदाबादच्या आऊटहाऊसमध्ये सुरु झालेली 'फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी' हा या स्वप्नाचा पहिला अविष्कार. त्यातूनच उभे राहिले ते भारतभरातील अनेक वैज्ञानिक संस्थांचे जाळे.आज 'इस्रो'च्या रूपात आकाराला आलेला अंतराळ संशोधनाचा महाकाय प्रकल्प हे याच विज्ञाननिष्ठेचे फलित आहे.

स्वराज्याच्या ऐन रणधुमाळीत दोन भारतीय वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी ब्रिटनमध्ये जातात आणि ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित होतात. परकीय भूमीवरचा तोच समुद्रकिनारा या दोघा 'साधकांना' दोन वेगळ्या तऱ्हांनी भावला. दोघेही मनस्वी कवी. प्रतिभावंत.रवींद्रनाथांनी 'मग्नलयी' ही निसर्ग बोलता करणारी अद्भुत कविता या सागराच्या सान्निध्यात लिहिली तर सावरकरांनी ब्रायटनच्या  याच समुद्राच्या सान्निध्यात 'ने मजसी ने..' हे  मातृभूमीचे विरहगीत लिहिले. दोन्ही कविता अजरामर ठरल्या. रवींद्रनाथांनी या प्रतिभेच्या बळावर देशाला शिक्षणसंपन्न करणारे शांतिनिकेतन उभारले तर सावरकरांनी क्रांतीच्या ज्वाला पेटवल्या. दोघांनीही आपापल्या गुणसुमनांनी देशाचीच सेवा केली. देशाची उभारणी झाली ती या अशा परस्पर पूरक कार्यानी आणि वरवर विरोधी वाटणाऱ्या तरीही सम्यक दिशेचा समतोल राखणाऱ्या विचारधारांनीही !

स्वातंत्र्य चळवळीला आकार देणाऱ्या या सर्वच लोकनेत्यांनी कदाचित परस्परविरोधी भूमिका घेतल्याही असतील, एकमेकांवर टीकाही केली असेल पण त्या भूमिकांना त्या त्या काळाचा संदर्भ होता. तो आता मागे पडला आहे. इतिहासाच्या या कालच उलटलेल्या पानावर आज ठसठशीतपणे दिसते आहे ते या सर्वांच्याच प्रयत्नांतून  स्वातंत्र्य चळवळीला मिळालेले अनोखे 'संतुलन' आणि त्यातूनच नेमकेपणाने  पुढे गेलेला चौफेर प्रगतीचा आमचा प्रवाह !

एका नकाशाच्या माध्यमातून दाखवता येण्याजोगा 'भारत' ब्रिटिशांनी उभा केला हे खरे आहे. इतिहासाच्या चक्रात बदलत राहणाऱ्या विविध 'शाह्यां'च्या किंवा 'साम्राज्या'च्या सीमा ब्रिटिश कालखंडात स्थिरावल्या आणि फाळणी होऊन एक मोठा भूभाग अखेरीस 'भारत' या नांवाने आपल्याला मिळाला हे ही खरे आहे पण 'खरे' त्याही पेक्षा अधिक काही आहे.

एका 'ठरावा'ने किंवा पेन्सिलीच्या रेघेने देश उभा राहत नसतो आणि 'राष्ट्र' असे एका रात्रीत जन्मही घेत नसते. मुळात एका समान संस्कृतीने बद्ध झालेला समाज,औपचारिक नामाभिधान नसले तरी स्वतःला 'भारतवर्षाचा'च भाग समजत होता. शेकडो बोलीभाषांमधून व्यक्त होणारी प्रतीके वेगळी असली तरी त्यामागचा भावार्थ मात्र एकच होता. कोणत्याही सलग रचनेचे हिस्सा नसलेले भाग बाहेरून विस्कळीत दिसत असले तरीही संस्कृतीच्या एका चिवट धाग्याने घट्ट जोडलेले होते.लोकशाही टिकली,वाढली आणि बहरली याचे कारण जगातील इतक्या मोठ्या बहुविधतेला सामावणारे एका समान 'राष्ट्रीयत्वा'चे भान येथे कायमच होते.

हे भान होते म्हणूनच या संस्कृतीमध्ये शिरलेल्या, माणसाला 'माणूसपण'च नाकारणाऱ्या अनेक प्रथा आपण अगदी स्वतःशीच संघर्ष करून नष्ट केल्या. तिला प्रवाही ठेवले.अशी प्रवाही संस्कृतीच राष्ट्राच्या एकत्वाचा कणा ठरू शकते. धार्मिक किंवा आर्थिक पायावर राष्ट्र असे उभे राहत नाही,काही काळ एकत्र राहिले तरी ते टिकत नाही. कारण तिथे नव्याचा स्वीकार नसतो आणि स्वार्थत्यागाची तयारीही नसते.

राष्ट्राच्या जडणघडणीमागचा हा सांस्कृतिक आधार, या जडणघडणीला आकार देणाऱ्या महापुरुषांचे योगदान,'संविधाना'च्या भक्कम पायावर उभे राहिलेले गणतंत्र, सामूहिक प्रगल्भतेच्या बळावर आम्ही गाठलेला प्रगतीचा टप्पा आणि विविधता जपूनही  बंधुत्वाने राहणारा विशाल जनसमुदाय हे आमचे अभिमानाचे बिंदू आहेत.

तिरंगी ध्वजाला प्रणाम करतांना या बिंदूंना सांधणारी एक सरळ रेघ मला डोळ्यांसमोर दिसते आणि द्वेष वा विरोधाचे सारे मळभ दूर सारून एका सकारात्मक ऊर्जेने मन भरून येते !